बीड (प्रतिनिधी): एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार आणि तितकाच क्रूरपणा… बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेणाऱ्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) वाल्मिक कराड याला आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सणसणीत चपराक लगावली आहे. कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला असून, त्याचा कारागृहातील मुक्काम आता कायम राहणार आहे.
या निकालाने देशमुख कुटुंबाला न्यायाची मोठी आशा मिळाली असली, तरी त्यांच्या मनावरील दहशतीचे सावट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही.
९ डिसेंबरचा तो काळा दिवस…
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली. खंडणीच्या क्षुल्लक वादातून माजी सरपंच संतोष देशमुख यांचे आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर अत्यंत थंड डोक्याने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखलेल्या या हत्येने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले होते.
न्यायदेवतेचा दणका: कनिष्ठ न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत नकार
स्वतःला वाचवण्यासाठी आरोपी वाल्मिक कराड याने प्रचंड धडपड केली. अटक झाल्यापासून त्याने जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात (High Court) जामिनासाठी अनेकदा अर्ज केले. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील भक्कम पुरावे पाहता दोन्ही न्यायालयांनी त्याला जामीन नाकारला.
शेवटी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, खटल्याचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आरोपीला बाहेर सोडल्यास तपासावर आणि साक्षीदारांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जर वर्षभरात खटला सुरू झाला नाही, तरच त्याला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची तांत्रिक मुभा असेल. तोपर्यंत त्याला गजाआडच राहावे लागेल.
सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, पण गावगुंडाची दहशत कायम
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे. “आमच्यावर झालेल्या अन्यायाला न्यायदेवतेने वाचा फोडली,” अशी भावनिक प्रतिक्रिया देशमुख कुटुंबाने दिली आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह! एकीकडे सुप्रीम कोर्टाने न्याय दिला असला, तरी दुसरीकडे बीड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या गुन्ह्यातील आणखी एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. संतापजनक बाब म्हणजे, हा फरार आरोपी चक्क गावात उजळ माथ्याने फिरत असून फिर्यादी आणि साक्षीदारांना उघडपणे धमक्या देत असल्याचा धक्कादायक आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. “आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे? पोलिसांना हा गुंड दिसत नाही का?” असा आर्त सवाल कुटुंबाकडून विचारला जात आहे.
वाल्मिक कराडला मिळालेला नकार हा गुन्हेगारांसाठी एक मोठी चपराक आहे, हे नक्की. मात्र, जोपर्यंत फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत आणि देशमुख कुटुंबाला पूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. बीड पोलीस आता तरी या फरार आरोपीला बेड्या ठोकणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.
बीड जिल्ह्याच्या प्रत्येक स्पंदनासाठी वाचत राहा




