बीड – जिल्हा कारागृहात झालेल्या गांजा प्रकरणामुळे कुख्यात गुन्हेगार सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड कारागृहातून हलवण्याचा महत्त्वाचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गांजा प्रकरणातून उघड झाले धक्कादायक वास्तव
बीड जिल्हा कारागृहात अज्ञात व्यक्तीने गांजा भरलेला रबरी चेंडू फेकल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या गांजाच्या वाटणीवरून चार न्यायाधीन कैद्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत चेंडू जप्त केला, मात्र या कृतीवरून कैद्यांनी अधिकाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. तपासात हा गांजा सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यासाठी मागविण्यात आल्याचे समोर आले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणात सतीश भोसलेसह चौघांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू असून संबंधित चौघांचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याआधीच कारागृह प्रशासनाने सतीश भोसलेला हरसुल कारागृहात हलवले.
बीड कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा कारागृह सतत वादग्रस्त ठरत आहे. मोबाईल, अमली पदार्थ, हत्या प्रकरणातील आरोपी यांचे स्थानांतरण अशा घटना घडत असतानाच आता गांजा प्रकरणामुळे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक पातळीवर गुन्हेगारी टोळ्यांचा कारागृहातील हालचालींवर प्रभाव असल्याचे आरोप केले जात आहेत.
जामीन मंजुरीनंतर घडला प्रकार
काही दिवसांपूर्वीच सतीश भोसलेला न्यायालयातून जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर घडलेल्या या गांजा प्रकरणामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर कारवाई होऊन त्याची रवानगी हरसुल कारागृहात झाली आहे.








