---Advertisement---

अजितदादांचा अपघात नव्हे, तर घातपात? रोहित पवारांनी उलगडले ‘ब्लॅक बॉक्स’चे रहस्य; फ्युएल टँक आणि लँडिंगच्या गणितावरून गंभीर आरोप!

On: February 18, 2026 10:03 AM
Follow Us:
---Advertisement---

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळ असतानाच, आता या घटनेला एक वेगळे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. अजितदादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताबाबत अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. “हे विमान कोसळले नाही, तर ते जाणीवपूर्वक आदळण्यात आले,” असा गंभीर आरोप करत रोहित पवार यांनी फ्यूल टँक, विमानाचे लँडिंग आणि व्हिजीबिलीटीचे तांत्रिक पुरावेच पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अश्रू अजूनही ओघळतायत, त्यातच रोहित पवारांचा मोठा दावा अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते आणि संपूर्ण राज्य अजूनही सावरलेले नाही. बारामतीवर शोककळा पसरलेली असतानाच रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने या दु:खाला संशयाची किनार जोडली आहे. रोहित पवार यांनी केवळ आरोप केले नाहीत, तर एका ‘प्रेझेन्टेशन’द्वारे तांत्रिक बाबींचा उलगडा करत या अपघातामागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे इतके तर्कशुद्ध आहेत की, प्रशासनाला आणि तपास यंत्रणांना याची दखल घ्यावीच लागणार आहे.

फ्युएल टँकचे गूढ: ३० हजारांसाठी जीव धोक्यात? रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो विमानातील इंधनाचा (Fuel). त्यांच्या मते, मुंबईवरून उड्डाण करताना विमानात पूर्ण इंधन भरण्यात आले होते. यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार म्हणाले, “मुंबईवरून हे विमान बारामतीला येत होते. बारामतीवरून ते पुढे हैदराबादला जाणार होते. मग मुंबईतच फुल टँक करण्याची काय गरज होती? बारामतीला पोहोचल्यावर तिथून पुढे जाताना इंधन भरता आले असते. काही तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात किंवा सुरतमध्ये इंधन स्वस्त मिळते, म्हणून कदाचित फुल टँक केला असावा. पण, गणिताचा विचार केला तर ३५०० लिटर इंधनामागे जास्तीत जास्त ३० ते ३५ हजार रुपयांचा फरक पडतो. अजितदादांसारख्या नेत्याच्या प्रवासात ३०-३५ हजार रुपयांची बचत करण्यासाठी पूर्ण इंधन भरून विमानाचे वजन वाढवणे आणि धोका पत्करणे कितपत योग्य होते?”

पुढे बोलताना त्यांनी यामागील घातपाताची शक्यता वर्तवली. “विमानात जास्त इंधन असणे म्हणजे अपघाताच्या वेळी मोठा स्फोट होणे. हे नियोजनबद्ध असावे. ‘पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानातील पेट्रोल पेटले,’ असेच या दुर्घटनेकडे पाहून म्हणावे लागेल. म्हणजेच, अपघात झाल्यास वाचण्याची कोणतीही शक्यता राहू नये, यासाठीच विमानाचा ‘फ्लाइंग बॉम्ब’ करण्यात आला होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

लँडिंगचे गणित आणि व्हिजीबिलीटीचा प्रश्न विमान चालवताना हवामान आणि दृश्यमानता (Visibility) हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. रोहित पवार यांनी या तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवत डीजीसीएच्या (DGCA) नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला.

“बारामतीमध्ये लँडिंग करण्यासाठी ३००० मीटरची व्हिजीबिलीटी होती. पण डीजीसीएच्या नियमांनुसार सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५००० मीटरची व्हिजीबिलीटी असणे आवश्यक आहे. जर दृश्यमानता ५००० पेक्षा कमी होती, तर पायलटने रिस्क का घेतली? मुळात मुंबईवरून उड्डाण करतानाच हवामानाचा अंदाज घेतला गेला नव्हता का? आणि जर घेतला होता, तर कमी दृश्यमानतेमध्ये लँडिंगचा अट्टाहास का केला गेला?” असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.

त्यांच्या मते, जेव्हा व्हिजीबिलीटी कमी असते, तेव्हा पायलटने लँडिंग न करता विमान परत नेणे किंवा दुसऱ्या विमानतळावर उतरवणे अपेक्षित असते. पण इथे तसे झाले नाही. “तुम्ही उगाचच जो फेरफटका मारला, तो न मारता अंदाज घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. ३००० ची व्हिजीबिलीटी असताना लँडिंगचा प्रयत्न करणे म्हणजे आत्मघातकी निर्णय होता,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

पर्यायी विमानतळांचे दरवाजे बंद होते का? जेव्हा नियोजित विमानतळावर लँडिंग शक्य नसते, तेव्हा पायलटकडे ‘अल्टरनेटिव्ह’ (पर्यायी) विमानतळाचा प्लान असणे आवश्यक असते. यावर भाष्य करताना रोहित पवार यांनी अत्यंत तांत्रिक माहिती दिली.

ते म्हणाले, “मी तुम्हाला जो ई-मेल दाखवतोय, तो त्यांचा अधिकृत फ्लाईट प्लॅन आहे. पण गंमत अशी की, त्यांनी हा प्लॅन डीजीसीएला (DGCA) अधिकृतपणे कळवला नव्हता. जेव्हा बारामतीत लँडिंग शक्य नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे कोणते पर्याय होते? १. पुणे एअरपोर्ट: ते पुण्यात लँड करू शकत नव्हते, कारण सकाळी तिथे डिफेन्सचे (संरक्षण दलाचे) फ्लाइंग सुरू असते. त्यामुळे पुण्याचा पर्याय बंद होता. २. सोलापूर एअरपोर्ट: सोलापूरला उतरवणे शक्य नव्हते, कारण तिथेही काही तांत्रिक अडचणी आहेत. ३. चिपी विमानतळ (सिंधुदुर्ग): हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असू शकला असता. पण तिथेही धुक्याची शक्यता असू शकते.

त्यामुळे, शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय उरत होता, तो म्हणजे मुंबईला परत जाणे. पण विमान परत नेले नाही. उलट ते बारामतीतच उतरवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा ते खाली आणले गेले.”

“विमान आदळण्यात आले…” रोहित पवार यांनी आपल्या आरोपांच्या शेवटी जे विधान केले, ते अंगावर शहारे आणणारे आहे. ते म्हणाले, “विमानात इंधन पूर्ण भरलेले होते. आत अधिकचे टँक होते. हवामान खराब होते. पर्यायी व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत परत जाण्याऐवजी हे विमान खाली आदळण्यात आले. आमचा स्पष्ट आरोप आहे की, हे विमान मुद्दामून आदळण्यात आले आहे.”

पायलटचा वापर करून हा घातपात घडवून आणला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. अपघातानंतर होणारा स्फोट मोठा असावा आणि त्यातून कोणीही वाचू नये, यासाठीच ‘फुल टँक’चा प्लॅन असावा, असा दावा त्यांनी केला.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी रोहित पवार यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांसारख्या बड्या नेत्याचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असू शकतो, या शक्यतेनेच अनेकांना धक्का बसला आहे. रोहित पवार यांनी सादर केलेले पुरावे, फ्लाईट प्लॅनचे ईमेल्स आणि इंधनाचे गणित पाहता, या प्रकरणाची तातडीने आणि सर्वोच्च पातळीवर चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकार आता या आरोपांची दखल घेणार का? डीजीसीए यावर काय स्पष्टीकरण देणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अजितदादांच्या मृत्यूचे गूढ उकलणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बारामतीकरांच्या मनात एकच प्रश्न घर करून आहे – “दादांचे विमान नक्की कोसळले की पाडले?”

( विशेष प्रतिनिधी, क्लिक टू न्यूज, महाराष्ट्र)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment