शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) : तब्बल ३७ वर्षांपूर्वी घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. साधूचा वेष धारण करून वर्षानुवर्षे पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या आरोपीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अटक करण्यात आली. राजेश उर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२८ ऑगस्ट १९८६ रोजी शहाजहानपूर येथे ज्वेलरी व्यावसायिक ओमप्रकाश रस्तोगी आणि त्यांचे मुनीम गंगादीन हे रिक्षाने दुकानाकडे जात होते. त्यावेळी रस्तोगी यांच्या हातात दुकानात स्वच्छतेसाठी वापरली जाणारी ॲसिडची बाटली होती. याच वेळी आरोपी राजेशने रिक्षा अडवून रस्तोगी यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यादरम्यान आरोपीने रस्तोगी यांच्या हातातील ॲसिडची बाटली हिसकावून घेत ती रस्तोगी आणि गंगादीन यांच्यावर फेकली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी राजेशला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जन्मठेप, जामीन आणि फरारी
या प्रकरणात न्यायालयाने ३० मे १९८८ रोजी आरोपी राजेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. जामीन मिळताच आरोपीने न्यायालयात हजेरी लावणे टाळले आणि तो फरार झाला. यानंतर न्यायालयाने त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते.
साधूचा वेष, धार्मिक स्थळांवर वास्तव्य
शहाजहानपूरचे पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झाल्यानंतर आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी साधूचा वेष धारण केला होता. तो एका धार्मिक स्थळावर तीन-चार महिने राहत असे आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असे. पोलिस आपल्याला कधीच पकडू शकणार नाहीत, या भ्रमात तो अनेक वर्षे फिरत होता.
अखेर आरोपीने मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील गायत्री शक्तिपीठात ठाण मांडले होते. मात्र, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
NAFIS प्रणालीमुळे आरोपी जेरबंद
१२ डिसेंबर रोजी शहाजहानपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील गायत्री शक्तिपीठातून आरोपी राजेश उर्फ राजूला अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी NAFIS (National Automated Fingerprint Identification System) या आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक द्विवेदी यांनी दिली.
काय आहे NAFIS प्रणाली?
NAFIS ही भारत सरकारने विकसित केलेली आधुनिक ओळख प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये आरोपीचे
फिंगरप्रिंट
चेहऱ्याची माहिती
बायोलॉजिकल डेटा
जतन केला जातो. कोणत्याही गुन्ह्यात फिंगरप्रिंट जुळल्यास ही प्रणाली तत्काळ पोलिसांना सूचना देते. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्य करणारी ही प्रणाली वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे.
३७ वर्षांनंतर न्यायाच्या दिशेने एक पाऊल
३७ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर अटकेत आल्याने पोलिस यंत्रणेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हेगार कितीही काळ लपून राहिला, तरी कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.









