मुंबई : मायानगरी मुंबईने पुन्हा एकदा आपली खाद्यपरंपरा जगासमोर सिद्ध केली आहे. ‘टेस्ट अॅटलस’ या जागतिक खाद्य रँकिंग संस्थेने नुकतीच 2025-2026 सालातील जगातील टॉप 100 फूड सिटीची यादी जाहीर केली असून, मुंबईने अभिमानास्पद पाचवे स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबईने अव्वल दिग्गजांना मागे टाकत हे यश मिळवले असून, विशेषत: मुंबईचा वडापाव, पावभाजी आणि भेळपुरी या पदार्थांनी जगभरातील खवय्यांना भुरळ घातली आहे.
मुंबई – स्ट्रीट फूडची राजधानी
मुंबई म्हणजे केवळ आर्थिक हृदय किंवा बॉलीवूडचे जग नसून, ते भारतीय स्ट्रीट फूडचे केंद्रस्थान आहे. वडापावचा झकास तडका, पावभाजीचा देशी मसालेदार स्वाद आणि शिवाजी पार्कपासून ते चाऊपाटीपर्यंत मिळणारी भेळपुरी—या सर्वांनी मुंबईला जागतिक दर्जा मिळवून दिला आहे.
या मानांकनात इटलीतील नेपल्सने पहिला क्रमांक पटकावला असला, तरी मुंबई ‘टॉप 5’मध्ये झळकणे हे भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी मोठा मान आणि अभिमानाची बाब मानली जात आहे. या रँकिंगसाठी १७ हजारांहून अधिक पदार्थांवर जगातील ५.९ लाखांहून अधिक लोकांची मते घेण्यात आली. या सर्वेक्षणातून भारतीय स्ट्रीट फूडची लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
भारतीय शहरांची दमदार कामगिरी
टॉप 100 शहरांच्या यादीत भारतातील 6 शहरांचा समावेश हा भारताच्या खाद्यवैविध्याचा उत्तम पुरावा आहे.
- मुंबई – 5 वा क्रमांक
- अमृतसर – 48 वा क्रमांक
- नवी दिल्ली – 53 वा क्रमांक
- हैदराबाद – 54 वा क्रमांक
- कोलकाता – 73 वा क्रमांक
- चेन्नई – 93 वा क्रमांक
यावरून भारतातील विविध प्रादेशिक संस्कृती, मसाले, चव आणि पारंपरिक बनवणी आजही जागतिक मंचावर टिकून आहेत, हे स्पष्ट होते.
‘टॉप 100 डिशेस’मध्ये धडाकेबाज भारतीय पदार्थ
शहरांबरोबरच टेस्ट अॅटलसने जगातील टॉप 100 डिशेसची यादीही प्रसिद्ध केली असून, या यादीतही भारतीय पदार्थांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.
- अमृतसरी कुलचा – 17 वा क्रमांक
- मुर्ग मखनी (बटर चिकन) – 66 वा क्रमांक
- हैदराबादी बिर्याणी – 72 वा क्रमांक
- शाही पनीर – 85 वा क्रमांक
जगभरातील फूड लव्हर्सनी विशेषतः उत्तर भारतीय आणि हैदराबादी पदार्थांना पसंती दर्शवली आहे.
भारतीय खाद्यप्रदेशांची चमक
टेस्ट अॅटलसने 2025 च्या जगातील टॉप 100 फूड रिजनची यादी प्रसिद्ध केली असून, यातही भारताने दमदार कामगिरी केली आहे.
- दक्षिण भारत – 40 वे स्थान
- पश्चिम बंगाल – 73 वे स्थान
- महाराष्ट्र – 76 वे स्थान
- केरळ – 97 वे स्थान
महाराष्ट्राने या यादीत स्थान मिळवणे, वडापाव, मिसळपाव, पोहे, थालीपीठ, कोल्हापुरी तडका इत्यादींचा जागतिक प्रभाव वाढल्याचे प्रतिक आहे.
जगातील खाद्यसंस्कृतीत भारत 13 व्या क्रमांकावर
जागतिक खाद्यसंस्कृतीच्या एकूण मानांकनात भारताने यावर्षी 13 वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षीच्या 12 व्या स्थानावरून एक पायरी खाली घसरत असला तरी भारताने पेरू, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या खाद्यसंस्कृती समृद्ध देशांना मागे टाकले आहे. टेस्ट अॅटलसने भारतातील तंदुरी चिकन, बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि कोरमा हे पदार्थ ‘अवश्य चाखावे’ अशी विशेष नोंदही केली आहे.
वडापावची जगभरात दणका
मुंबईचा साधासुधा वडापाव — मध्यमवर्गीयांचे प्राण, कामगारांचा ऊर्जा स्रोत, विद्यार्थ्यांचा फेव्हरेट स्नॅक — आज जगभर आपली दाद मिळवत आहे. जागतिक मंचावर त्याची धडाकेबाज एन्ट्री मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.





