शिराळा तालुका : शिवरवाडी (ता. शिराळा) या डोंगररांगेतील शांत गावात गुरुवारी (दि. ११) सकाळी अचानक बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. पहाटेच्या वेळेस आलेल्या या अवचित पाहुण्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल चार तासांच्या कौशल्यपूर्ण आणि संयमी प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश मिळवले.
नवीन घरकुलात बिबट्याची एन्ट्री
अशोक बेंद्रे यांच्या नवीन घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना ही घटना घडली. सकाळी अंदाजे सातच्या सुमारास अशोक यांचे बंधू नाथा बेंद्रे पाण्याची पाईप तपासण्यासाठी घरात गेले असता त्यांना केवळ तीन फुटांवर बिबट्या दिसला. क्षणार्धात बिबट्याने त्यांच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केला; मात्र नाथा यांनी चातुर्याने बचाव करत बाहेर धावत येऊन संपूर्ण परिस्थिती घरच्यांना सांगितली. ही माहिती क्षणभरातच गावभर पसरली.
ग्रामस्थांची तत्परता व वन विभागाला धाव
परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घराचे दोन्ही दरवाजे लोखंडी पत्र्यांनी बंद करून त्या परिसरात कोणीही जाणार नाही याची दक्षता घेतली. शिराळा वन विभागाला तत्काळ संपर्क साधण्यात आला. शिराळा–शिवरवाडी हे १७ किलोमीटरचे घाटातील अंतर वन विभागाच्या पथकाने केवळ एका तासात पार करून घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मोठ्या गर्दीमुळे आणि सततचा गोंधळ झाल्याने बिबट्या अधिकच चिडचिडा झाला होता. त्याचा डरकाळ्यांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता.
संयम, कल्पकता आणि अनुभवाची किमया
उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे आणि ‘सह्याद्री रेस्क्यू वॉरिअर्स’चे सुशीलकुमार गायकवाड यांच्यासह पथकाने घराची तपासणी केली.
मुख्य दरवाजाला पिंजरा लावण्यात आला; मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्याने त्याला पिंजऱ्याकडे आणणे कठीण बनले होते. पथकाने घराच्या वरच्या बाजूने पत्रे वाजवून, तसेच फटाक्यांचे आवाज करून बिबट्याला योग्य दिशेने हाकलण्याचे धोरण आखले. अखेर अचूक नियोजन आणि संयमाच्या जोरावर सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विशेष म्हणजे, विभागाकडे कोणतेही भुलीची इंजेक्शन किंवा अत्याधुनिक साधने नसतानाही केवळ अनुभव व कल्पकतेच्या जोरावर ही कारवाई यशस्वी झाली.
गर्दीचा त्रास; बचावकार्यास अडथळा
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तरुण वर्ग मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यात गुंग असल्यामुळे वन कर्मचाऱ्यांना वारंवार अडथळा निर्माण होत होता. बचावकार्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करूनही अनेकजण ते पाळत नसल्याचे दिसून आले.
वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता
बिबट्याला पकडल्यानंतर पथकाने त्याला शिराळा वन विभाग कार्यालयात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन गुरव यांनी तपासणी करून बिबट्या पूर्णपणे सुरक्षित व तंदुरुस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर वन विभागाने त्याला योग्य ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
या वेळी विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक, सरपंच श्रीकांत पाळेकर, उपसरपंच सोपान बेंद्रे, पोलिसपाटील मोहन घागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांचा संताप : माहिती दिली तरीही दुर्लक्ष?
ग्रामस्थांनी वन विभागावर नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वीच बिबट्या परिसरात फिरत असल्याची माहिती दिली होती; परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच सतत वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.








