बीड | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.
हाके म्हणाले, “बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. आता त्या प्रकारचीच घटना मुंबईत घडवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. या काळात मुंबईला जाऊन दंगल घडवायची हीच त्यांची योजना आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करत हाके म्हणाले, “जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करून बिघडवण्याचा त्यांचा डाव हाणून पाडावा.”
गुन्हा दाखल करण्याची मागणी
हाके यांनी पुढे सांगितले, “मनोज जरांगे पाटील यांची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबावे. बेकायदेशीर मागण्या करत असताना त्यांचे लाड का केले जातात? याचं उत्तर सरकारने द्यावं.” तसेच त्यांनी जरांगे पाटील यांना हिंदी विषयाचे अवलोकन करण्याचा सल्लाही दिला.
शरद पवारांवर टीका
हाके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचा हा एकमेव कार्यक्रम शरद पवार आणि जरांगे पाटील यांचा आहे. जर प्रशासनाने झुंडशाहीला बळी पडून वेगळा निर्णय घेतला तर ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल.”
ते पुढे म्हणाले, “मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी असून, ओबीसींना वेड्यात काढण्याचा प्रयत्न पवार पक्षाचा आहे.”








